बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र - विकिस्रोत Jump to content Main menu Main menu move to sidebar hide सुचालन मुखपृष्ठ समाज मुखपृष्ठ सद्य घटना अलीकडील बदल अविशिष्ट लेख साहाय्य चावडी शोधा शोधा Appearance दान नवीन खाते तयार करा प्रवेश करा(लॉग इन करा) वैयक्तिक साधने दान नवीन खाते तयार करा प्रवेश करा(लॉग इन करा) बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र Add languages दुवे जोडा लेख स्त्रोत चर्चा मराठी वाचा संपादन इतिहास पहा साधने Tools move to sidebar hide Actions वाचा संपादन इतिहास पहा General येथे काय जोडले आहे या पृष्ठासंबंधीचे बदल संचिका चढवा शाश्वत दुवा पानाची माहिती हे पान उधृत करा Get shortened URL छापा PDF छापा छापण्यायोग्य आवृत्ती इतर प्रकल्पात विकिडाटा कलम Appearance move to sidebar hide Download विकिस्रोत कडून बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र (१९०२) साहित्यिक दत्तात्रय बळवंत पारसनीस शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत→ sister projects: Wikidata item. 72868बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र१९०२ हरि नारायण आपटेकृत आजकालच्या गोष्टी गोष्ट—३. जग हें असें आहे! ज्यांनी आजकालच्या गोष्टी "मधली स्थिति” व "पण लक्षात कोण घेतो?" ह्या कादंबऱ्या वाचल्या आहेत त्यांस ही त्याच कादंबरीकाराची तिसरी गोष्ट किती सुरस असेल हे सांगावयास नकोच. शिवाय ही करमणूक पत्रात क्रमशः प्रसिद्ध झाली असल्यामुळे करमणुकीचे वाचकांस हिचा रसास्वाद मिळालाच आहे. तेव्हां हिच्या गोडीचे वर्णन करण्याची आता आवश्यकता नाहीं. लेखकाच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे या गोष्टींतही अनेकविध पात्रे आहेत. चार पाच इंग्रजी पात्रे आहेत. राजकर्ते आणि प्रजाजन यांचे अधिक संघटन होण्यास काय केले पाहिजे याचेही दिग्दर्शन आहे. सांचा "पण लक्ष्यांत कोण घेतो ?" या कादंबरीसारखा परंतु टाईप मोठा. पृष्ठसंख्या ५३५. पुस्तकांत गोष्टींतील कथानकास अनुसरून मुद्दाम विलायतेहून करवून आणलेली सुंदर पानभर अशी ७ चित्रे घातली आहेत. किंमत रु. २-८-० टपालखर्च ४ आणे व व्ही. पी. खर्च १ आणा. बाबाजी सखाराम आणि मंडळी, इसुफ बिल्डिग्ज, मुंबई. महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे. महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र. दत्तात्रय बळवंत पारसनीस. प्रकाशकः- बाबाजी सखाराम आणि कंपनी, इसुफबिल्डिंग्ज, मुंबई. "निर्णयसागर" छापखान्यांत छापिलें. किंमत १२ आणे. (हें पुस्तक इ० स० १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणें ग्रंथकर्त्यानें सर्व हक्क आपले स्वाधीन ठेविले आहेत.) हे पुस्तक महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांचे प्रपौत्र श्रीमंत अलिजाबहादुर महाराज माधवरावसाहेब शिंदे जी. सी. एस्. आय्., संस्थान ग्वाल्हेर, ह्यांस प्रेमपूर्वक अर्पण केले असे. ग्रंथकर्ता. "*** a woman of sense.”—Doulat Rao Scindia. "** The most remarkable woman of the day.”—Dr. Hope. “She was a woman of high spirit and respectable conduct.”—Mill. "* * * * A woman of great activity and enterprise. * A Woman of very great Indian celebrity.”—Mrs. Duberly. "****a clever and spirited woman.”—Major Sutherland. “* This lady was not less famous, in her way, than the Begum Sumroo, the Nagpore Ranee, the late Ranee of Jhansi, the Ranee Chanda of Lahore, and the Begum of Bhopal, and she has on more than one occasion been known to lead, in person, a charge of Mahratta horse against the enemies of her country.”—The Bombay Gazette. प्रस्तावना. . हिंदुस्थानच्या प्राचीन व अर्वाचीन इतिहासामध्यें ज्या राजकारणी, सद्गुणी, विदुषी, चतुर, साहसी, शूर, स्वाभिमानी, तेजस्वी, उदार, आणि धार्मिक अशा स्त्रिया होऊन गेल्या, त्यांची संख्या पुष्कळ आहे. परंतु त्यांच्या चरित्रांच्या अभावामुळे त्यांचे यश अगदी अप्रसिद्ध व संकुचित राहिले आहे. ह्या योगाने आमच्या राष्ट्रांतील स्त्रिया अगदी कमी प्रतीच्या लेखण्याचा प्रघात पडला आहे. परंतु वस्तुस्थिति तशी नाहीं. आमच्या देशांत “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः" अशा प्रकारची पूर्वीं स्त्रियांविषयी सन्मानबुद्धि असून, स्त्रियाही आपल्या उत्तम गुणांनी ह्या सन्मानास पूर्णपणे पात्र होत्या. परंतु त्यांची उज्ज्वल चरित्रे किंवा गुणमहिमा आमच्या नेत्रांसमोर नसल्यामुळे त्यांचे सद्गुण, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची कर्तृत्वशक्ति ह्यांविषयीं आमच्या मनांत यत्किंचितही प्रकाश पडत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीं ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हती' असला अनुदार विचार मनांत ठाम बसून, त्यांना बंद्या गुलामाप्रमाणे वागविण्याची स्वाभाविक प्रवृत्ति पडली आहे. त्याकारणाने त्यांच्या शिक्षणाबद्दल व उन्नतीबद्दल निष्काळजीपणा उत्पन्न होऊन आमच्या संसाररथाचे एक चक्र अगदी लुळे पडले आहे व समाजाची व राष्ट्राची फार हानि झाली आहे. म्हणजे, पर्यायेंकरून, चरित्रप्रकाशनाच्या योगाने उत्तम गुणांचे प्रतिबिंब मनावर चांगल्या रीतीने उमटून, सत्कृत्याविषयी प्रेरणा-सद्गुण आणि सत्कृत्त्याविषयी आसक्ति ही उत्पन्न होऊन स्त्रीपुरुषांस जो अप्रतिम लाभ व्हावयाचा तो आमच्या देशांत चरित्रप्रकाशनाच्या अभावामुळें अगदी नाहीसा झाला आहे, असें म्हटलें असतां फारसा बाध येणार नाहीं. पौराणिक कालापासून आमच्या देशांतील प्रसिद्ध स्त्रियांच्या चरित्रांचे संशोधन केले, तर ती चरित्रे कोणत्याही राष्ट्रांतील तत्कालीन स्त्रियांच्या चरित्रांपेक्षा कमी मनोरम अथवा कमी सुरस आहेत असें म्हणतां येणार नाहीं. ग्रीस देशांतील सॅफो, ॲस्पाशिया, लेस, ऱ्हीन, टिमॉक्सेना ह्या प्राचीन स्त्रीयांची चरित्रे घेतली, किंवा रोमन राष्ट्रांतील लुशिया, व्हर्जिनिया, कॉर्नि लिया, पोर्शिया, हेलीना ह्या स्त्रियांची चरित्रे घेतली, किंवा इटालियन राष्ट्रांतील कोरिना हिचें चरित्रें घेतलें; तरी आमच्या राष्ट्रांतील अहल्या, सीता, तारा,मंडोदरी, कुंती, द्रौपदी इत्यादि स्त्रियांच्या परम पवित्र, पुण्यशील, चमत्कृति-प्रचुर आणि सुरस चरित्रांत जे स्वारस्य आणि जें अप्रतिमत्व आहे, तेंच आह्मांस परदेशीय स्त्रियांपेक्षां स्वदेशीय स्त्रिया ह्या नात्याने अधिक कौतुकास्पद व अभिनंदनीय असे वाटणें साहजिक आहे. ह्या वंदनपात्र साध्वी स्त्रियांसंबंधानें, अहल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा। पंचकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ॥ १ ॥ ह्मणजे “अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंडोदरी ह्या पांच स्त्रियांचे जो नित्य स्मरण करील त्याचें महत्पापही नाश पावेल.” असा कोणी मार्मिकानें जो महिमा वर्णन केला आहे, तो अगदीं यथार्थ आहे. ह्या स्त्रियांप्रमाणेच, याज्ञवल्क्य ऋषीची पत्नी मैत्रेयी, वाचकूची मुलगी गार्गी, शकुंतला, गांधारी, उत्तरा, यशोदा, राधा, रुक्मिणी, दमयंती, उखा, वगैरे पुराणप्रसिद्ध स्त्रियांचीं चरित्रें महत्त्वाचीं व बोधपर असून, तीं हिंदुस्थानांत पुराणकालींही किती थोर स्त्रिया निर्माण झाल्या होत्या, हें सिद्ध करीत आहेत. ह्या पौराणिक कालांतून इतिहासाच्या कालांत आलें, ह्मणजे दिल्लीची राज्ञी प्रेमदेवी, कालिदासाची पत्नी विद्योत्तमा, भास्कराचार्यांची कन्या लीलावती, वराहमिहिराची बायको, आणि लक्ष्मणसेन राजाची महाराणी, ह्या विदुषी व शास्त्रपारंगत स्त्रिया दृष्टीस पडतात. ह्यानंतर हिंदुस्थानच्या वीरकाला (age of chivalry) मध्ये प्रवेश केला, तर रजपूत स्त्रियांच्या अलौकिक गुणांनीं नेत्र दिपून जातात. त्यांचे अपार शौर्य, अढळ पातिव्रत्य, अप्रतिम तेजस्विता, लोकोतर खामिभक्ति, असाधारण स्वार्थत्याग, आणि अपूर्व रणोत्साह पाहून अंतःकरण आनंदानें व आश्चर्यानें थक्क होऊन जाते; व अशीं स्त्रीरत्नें ज्या राष्ट्रांत निर्माण झालीं, तें राष्ट्र धन्य होय असें वाटतें. राणी संयोगिता, राजकन्या कूर्मदेवी, राणी पद्मिनी, गुर्जरदेशस्थ राज्ञी कमलदेवी व देवलदेवी, साध्वी मिराबाई, ग्वाल्हेरची राणी मृगनयना, ताराबाई, रूपमती, गढमंडलाची राणी दुर्गावती, जोधपुरची राजकन्या जोधाबाई, ह्यांची चरित्रें इतकीं वीररसपरिप्लुत व रमणीय आहेत कीं, त्यांच्या योगाने अंतःकरण तल्लीन झाल्यावांचून राहत नाहीं. ह्या रजपूत स्त्रियांनंतर मराठ्यांच्या स्त्रियांकडे वळलें, तर त्यांचींही चरित्रें तशींच मनोहर व रसभरित आहेत असे गर्वानें ह्मणतां येतें. ह्या सर्व महाराष्ट्र स्त्रियांमध्यें इंदूरच्या महाराणी अहल्याबाई ह्यांचे चरित्र अत्यंत पवित्र, अत्यंत रसाळ, आणि अत्यंत सोज्वल आहे. त्या चरित्राची बरोबरी सर्व राष्ट्रांतील व सर्व देशांतील एकाही स्त्रीचरित्रानें करवणार नाहीं. टॉरेन्स नामक इंग्रज ग्रंथकारानें अहल्याबाईची तुलना, रशियाची राणी क्याथराईन, इंग्लंडची राणी इलिझाबेथ, आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट ह्यांच्याशी करून, देवी अहल्याबाई त्यांच्याहीपेक्षां अनेक सद्भुणांनीं श्रेष्ठ होती, असे प्रांजलपणे कबूल केले आहे. दुस-या एका इंग्रज ग्रंथकारानें ही साध्वी रूपाने सुंदर नव्हती, तरी वर्डस्वर्थ, कवीनें वर्णिल्याप्रमाणेः “A perfect woman, nobly plann'd To warn, to comfort, and command; And yet a spirit still and bright With something of an angel-light." “सर्व जनांस सन्मार्ग दाखविण्याकरितां, त्यांना सुख देण्याकरितां, आणि त्यांच्यावर अधिकार चालविण्याकरितां निर्माण झालेली ही सर्वगुणसंपन्न अशी स्त्री परमेश्वराची एक अपूर्व कृति होती. तिची कांति तेजस्वी असून सुशांत अशी होती; किंबहुना ती एक तेजोमयी देवताच होती.” असें ध्वनित करून, निरभिमानतया असें कबूल केले आहे कीं, ही लोकोत्तर स्त्री आपली अपूर्व धर्मशीलता, उदात्त सुशीलता, निस्सीम कर्तव्यदक्षता, विलक्षण कार्यक्षमता, अद्भुत तेजस्विता आणि प्रशंसनीय उद्यमशीलता - इत्यादि सद्गुणांच्या योगानें हिंदुस्थानांतील पुण्यश्लोक व महाप्रतापी अशा कोणत्याही नृपवर्याच्या मालिकेंत, अथवा कोणत्याही राष्ट्रांतील स्त्रीजातीच्या अत्यंत तेजस्वी अशा रत्नावलींत, विराजमान होण्यासारखी आहे१[१] अशी महासाध्वी-केवळ अवतारी-स्त्री मराठी राज्यांत निर्माण झाली असून, तिचें सविस्तर व साधार चरित्र उपलब्ध नसावें ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होय१[२] ! अहल्याबाईप्रमाणेंच मराठ्यांच्या इतिहासांत, जिजाबाई, येसूबाई, दीपाबाई, ताराबाई ह्या भोंसले घराण्यांतील व राधाबाई, काशीबाई व गोपिकाबाई ह्या पेशवे घराण्यांतील स्त्रिया चरित्रलेखनयोग्य आहेत. त्यांच्या तोडीच्या उमाबाई दाभाडे, मैनाबाई पवार, बायजाबाई शिंदे, आणि रखमाबाई चासकर ह्या प्रख्यात स्त्रिया होऊन गेल्या; परंतु त्यांची सुंदर व विस्तृत चरित्रे प्रसिद्ध नसल्यामुळें इतिहासग्रंथांत व जुन्या बखरींत फक्त त्यांचा नामनिर्देश मात्र दृष्टीस पडतो. ह्यांशिवाय वाराणशीबाई पेशवे व जिऊबाई फडनवीस ह्या स्त्रियांच्या संबंधाने युरोपियन लोकांनीं क्वचित् क्वचित् उल्लेख केलेला दृष्टीस पडतो. मेजर-जनरल सर आर्थर वेलस्ली ह्या प्रसिद्ध इंग्रजी सेनापतीने नाना फडनविसांची बायको जिऊबाई हिची भेट घेऊन, ता. १८ मे इ. स. १८०४ रोजीं, पुण्याचे रेसिडेंट कर्नल क्लोज ह्यांस असे कळविलें कीं, “ही बाई फार सुस्वरूप व सौंदर्यवती असून, हिच्या संबंधाने तहामध्ये कांहीं तजवीज व्हावी अशी हिची योग्यता आहे२ [३] .” शेवटचे बाजीराव पेशवे व प्रतिनिधि ह्यांच्या स्त्रियांसंबंधानें ग्रांटडफसाहेबांनीं एके ठिकाणीं फार प्रशंसा केली आहे. ग्रांटडफसाहेबांस शेवटच्या पेशव्यांची स्त्री वाराणशीबाई हिला वाईहून ब्रह्मावर्तास श्रीमंतांकडे पाठविण्याचा प्रसंग आला, त्या वेळी ह्या बाईने फारच चांगले वर्तन केले, असे त्यांनी लिहिले आहे. एवढेंच नव्हे, तर "हिंदुस्थानांतील उच्च वर्गातील लोकांशीं वागतांना त्यांच्या मानमरातबांत किंवा शिष्टाचारांत जोपर्यंत अंतर पडू दिलें नाहीं, तोंपर्यंत अगदीं श्रेष्ठ दर्जाच्या व विद्याचारसंपन्न अशा युरोपियन लोकांमध्ये जें सौजन्य व जी विनयशीलता आढळून येते, ती त्यांच्या ठिकाणीं दृष्टीस पडते, हे पाहून फार विस्मय वाटतो." असें मोठ्या कौतुकाने लिहिले आहे१[४] . असो. पेशवाईअखेरपर्यंत मराठ्यांच्या स्त्रियांमध्यें अलौकिक गुण होते, असेच केवळ मानण्याचें कारण नाहीं. अद्यापि देखील ब्रिटिश सरकारच्या कृपेनें अवशेष राहिलेल्या मराठे संस्थानांत राजकारस्थानपटु, धर्मनिष्ठ, ईश्वरभक्तिपरायण, परोपकाररत, आणि विद्याभिलाषी अशा स्त्रिया क्वचित् क्वचित् चमकत असतात. फलटण संस्थानांतील सगुणाबाई निंबाळकर, औंध संस्थानांतील आईसाहेब पंतप्रतिनिधि, डफळापूर येथील वाईसाहेव डफळे, आणि आर्या. सत्संगफल मिळालें सुगमपथा लाविलें मला पतिनें | आस्वादिलें यथेष्ट द्विरदमुखकथासुधेसि मन्मतिनें ॥ १ ॥ अशा प्रेमळ व रसाळ वाणीने पतिकृपेचा महिमा वर्णन करून ईशस्तवनांत कालक्षेप करणाऱ्या कविराज कै. बापूसाहेब कुरुंदवाडकर ह्यांच्या पत्नी, ह्या स्त्रियाही कमी योग्यतेच्या नाहींत. परंतु त्यांची चरित्रें अथवा गुणवर्णनें प्रसिद्ध नसल्यामुळें निर्जन अरण्यांतील जातिकुसुमाप्रमाणे त्यांचा कीर्तिसौरभि कालरूपी वायू भक्षण करीत आहे. ह्या सर्व स्त्रियांची चरित्रें जसजशी प्रसिद्ध होतील, त्याप्रमाणें आपल्या राष्ट्रांतील स्त्रियांचे उत्तम गुण व त्यांची योग्यता अधिक प्रकाशित होऊन भावी पिढीस त्याचा फार फायदा होईल. परंतु हे काम इतिहासग्रंथ व चरित्रें ह्यांवांचून होणे दुरापास्त आहे. ह्याकरितां प्रत्येकाने यथामति व यथाशक्ति इकडे लक्ष्य देणें अवश्य आहे. हाच हेतु मनांत धरून झांशीच्या राणीचे चरित्र महाराष्ट्र भाषेत स्वतंत्र माहिती गोळा करून इ० स० १८९४ सालीं प्रसिद्ध करण्यांत आलें. त्याचा अनेक रसिक व सहृदय वाचकांनीं मोठ्या प्रेमभावानें स्वीकार केला, हें कळविण्यास फार संतोष वाटतो. ह्या पुस्तकास जरी महाराष्ट्रांत चांगला लोकाश्रय मिळाला नाहीं, तरी त्याची गुजराथी, बंगाली वगैरे परभाषांतून जीं भाषांतरें प्रसिद्ध झाली आहेत, तींच त्याच्या लोकप्रियतेची साक्ष होत. अशा प्रकारें प्रथम प्रयत्नास प्रोत्साहन मिळाल्यामुळें इतिहासप्रसिद्ध व कर्तृत्वशाली स्त्रियांची हळूहळू चरित्रमाला गुंफण्याचा आमचा दृढ संकल्प झाला आहे. त्या मालेचें "महाराणी बायजाबाईसाहेव शिंदे ह्यांचे चरित्र" हें द्वितीय पुष्प होय. बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे नांव जुन्या लोकांच्या मुखांतून मात्र आजपर्यंत ऐकू येत होतें;
Bharat Shelf
बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र
Dattatray Balwant Parasnis · 1902
Page 1 of 1