Skip to content
loyalties.space
Cart0
Back to the book

Bharat Shelf

इचलकरंजी संस्थानाचा इतिहास

Vasudev Waman Khare · 1913

इचलकरंजी संस्थानाचा इतिहास - विकिस्रोत Jump to content Main menu Main menu move to sidebar hide सुचालन मुखपृष्ठ समाज मुखपृष्ठ सद्य घटना अलीकडील बदल अविशिष्ट लेख साहाय्य चावडी शोधा शोधा Appearance दान नवीन खाते तयार करा प्रवेश करा(लॉग इन करा) वैयक्तिक साधने दान नवीन खाते तयार करा प्रवेश करा(लॉग इन करा) इचलकरंजी संस्थानाचा इतिहास Add languages दुवे जोडा लेख स्त्रोत चर्चा मराठी वाचा View source इतिहास पहा साधने Tools move to sidebar hide Actions वाचा View source इतिहास पहा General येथे काय जोडले आहे या पृष्ठासंबंधीचे बदल संचिका चढवा शाश्वत दुवा पानाची माहिती हे पान उधृत करा Get shortened URL छापा PDF छापा छापण्यायोग्य आवृत्ती इतर प्रकल्पात विकिडाटा कलम Appearance move to sidebar hide Download विकिस्रोत कडून इचलकरंजी संस्थानाचा इतिहास (1913) साहित्यिक वासुदेव वामन खरे इचलकरंजी संस्थानाचा इतिहास sister projects: Wikidata item. 41266इचलकरंजी संस्थानाचा इतिहास — इचलकरंजी संस्थानाचा इतिहास1913 इचलकरंजी संस्थानचा इतिहास. हा ग्रंथ वासुदेव वामन खरे, यांनी तयार करून पुणे येथें आर्यभूषण छापखान्यांत छापिला, शके १८३५ सन १९१३ किंमत दीड रुपया. श्री. रा. बाबासाहेब इचलकरंजीकर यांच्या विशेष इच्छेवरून हा ग्रंथ महाराष्ट्राचे सर्वमान्य इतिहासकार विद्वन्मुकुटमणि कै. महादेव गोविंद रानडे यांचें स्मारक म्हणून छापवून प्रसिद्ध केला असे. ग्रंथकार. प्रस्तावना. माझ्या ऐतिहासिक लेख-संग्रहासाठीं मी पटवर्धन जहागीरदारांची जुनी दप्तरे वाचून पाहू लागलो तेव्हां पटवर्धनांशीं मूळपासून निकट संबंध असलेले इचलकरंजीकर घोरपडे यांचेही दप्तर वाचण्याची मला उत्कट इच्छा झाली. ती माझी इच्छा इचलकरंजी संस्थानाचे हल्लीचे अधिपति श्रीमंत रा. बाबासाहेब इचलकरंजीकर यांनी मोठ्या खुषीनें पूर्ण केली. इतकेंच नाही,तर आपल्या संस्थानच्या दप्तरांतून निवडक लेखांच्या नकला घेऊन त्या छापण्याचीही परवानगी दिली. त्याप्रमाणे या संस्थानच्या दप्तरांतल्या पुष्कळ पत्रे यादी आजपर्यंत ऐ. ले. संग्रहांत छापिल्या गेल्या आहेत व पुढेही छापिल्या जातील. ऐ. ले. संग्रहांत मुख्यतः पटवर्धन जहागिरीचा इतिहास व तत्संबंधाचे लेख प्रसिद्ध होत आहेत. इचलकरंजीचा इतिहासही पटवर्धनी जहागिरीच्या इतिहासाप्रमाणेच फक्त लढाया व स्वार्‍याशिकार्‍या यांच्या वर्णनांनीच भरलेला असेल व ऐ.ले. संग्रहांत त्याचा सहज समावेश करितां येईल असें प्रथम वाटलें होतें, पण इचलकरंजीचे दप्तर वाचून पाहिल्यावर खात्री झाली कीं, या संस्थानाचा इतिहास ऐ. ले. संग्रहांत पटवर्धनी जहागिरीचा इतिहास येत असतो, त्याहून बर्‍याच बाबतींत भिन्न आहे. जहागीर व संस्थान यांच्या स्थितींत जो भेद आहे त्यावरून ही इतिहासाची भिन्नता उत्पन्न झाली आहे. पटवर्धनांच्या जहागिरी या लष्करी नोकरीकरितांच दिलेल्या असल्यामुळे त्यावर मध्यवर्ती सत्तेच्या नोकरीचा बोजा होता, पण इचलकरंजी संस्थान हें सर्व इनाम असल्यामुळे त्यावर कोणाचीही नोकरी करण्याचा बोजा नव्हता. हिंदुस्थानात सर्व संस्थान इनाम असल्याचें हे एकच उदाहरण माझा पहाण्यांत आहे. एका खेड्यापासून तो मोठ्या प्रांतापर्यंत पटवर्धनांच्या जहागिरी त्या कुलांतील पुरुषांनी केवळ तरवारीच्या जोरावर मिळविल्या आहेत व राखिल्या आहेत. इचलकरंजी संस्थानाचा प्रारंभ त्याच कारणाने झालेला असला तरी त्याचा विस्तार व रक्षण होण्याच्या कामी एका बुद्धिमान् बाईची ४० वर्षांची करामत खर्ची पडलेली आहे ! पटवर्धनांचा वतनदारीशी कांहीं सबंध नाही, पण इचलकरंजी संस्थानावरची बहुतेक संकटे वतनदारीमुळे प्राप्त झालेली आहेत ! हिंदुस्थानांतील लोकांची वतनावर अत्यंत आसक्ति असते असे परक्या लोकांनी आम्हांविषयीं वर्णन केलेले आहे. इचलकरंजीचा इतिहास वाचला म्हणजे त्या वर्णनाचा खरेपणा मनास चांगला पटतो ! करवीर राज्यांतलें सालिना चार हजार रुपयांचे भिकार देशमुखीचे वतन तें काय, आणि तें राखण्यासाठी इचलकरंजी संस्थानाने करवीरकरांशी तीन वर्षे लढाई करावी आणि पांच लक्ष रुपये खर्च करावे ! केवढा अल्प लाभ आणि केवढी मोठी हानि ! या लढाईला अन्य कारणेही आहेत, पण मुख्य कारण वतनदारी ! पटवर्धनी जहागिरी व इचलकरंजी संस्थान यांत वर लिहिलेल्या प्रकारची विसदृशता असल्यामुळे इचलकरंजी संस्थानाचा इतिहास ऐ. ले. संग्रहांत न आणितां त्याचा स्वतंत्रच ग्रंथ लिहावा असें मनांत आलें व त्याप्रमाणे शेवटच्या तीन प्रकरणांखेरीज बाकीचा सर्व इतिहास तयार करून पुष्कळ दिवस झाले. यंदां हा इतिहास छापण्याचा योग यदृच्छेनें आल्यामुळे सर्व ग्रंथ समाप्त करून वाचकांस सादर करीत आहे. सातारचे महाराज, पेशवे व करवीरकरमहाराज यांच्या दौलतींच्या इतिहासांत इचलकरंजी संस्थानाचा उद्भव, विस्तार व त्यावर आलेली नानाविध संकटांची परंपरा यांची गुंतागुंत झालेली असल्यामुळें अंगीकृत कार्याच्या विशदीकरणार्थ त्या त्या दौलतींची हकीगत कारणपरत्वें त्या त्या स्थळी देणे मला योग्य वाटले. शाहूमहाराजांच्या मृत्यू आधीचे व नंतरचे प्रसंग संक्षेपाने वर्णिले असते व पेशवाईच्या घटनेसंबंधी कांहींच लिहिलें नसतें तरी चाललें असते; परंतु तो मजकूर घालण्याची कारणे मी तेथे तेथे दिली आहेत त्याने वाचकांचे समाधान होईल अशी उमेद आहे. इचलकरंजी संस्थानाचा इतिहास म्हणजे मराठी राज्यांतल्या अंतःकलहांचा व विशेषेकरून इचलकरंजी व करवीर या संस्थानांमधल्या कलहांचा इतिहास होय. असले कलह वर्णन करण्याचे काम फारसे उत्साहजनक नसते. शिवाय कलहास प्रवृत्त झालेल्या दोघांपैकी कोणा तरी एकाविषयीं पक्षपात होण्याचे भय असतें. तथापि आस्थेने मेहनत करून माहिती मिळवावी, आणि कोणाचाही बुद्धिपूर्वक पक्षपात न करितां जें खरं वाटेल तें निर्भीडपणे लिहावें, असा संकल्प करून हें काम आम्हीं हाती घेतले. ते आमच्या संकल्पाप्रमाणे कितपत तडीस गेले आहे हे ठरविणे वाचकांकडे आहे. हा ग्रंथ तयार करण्याच्या कामी इचलकरंजीचे:जुनें दप्तर, ऐ. ले. संग्रह, काव्येतिहास संग्रह, इतिहाससंग्रह, भारतवर्ष, राजवाडे यानीं प्रसिद्ध केलेले खंड, मोडकांचा इतिहास, डफ्, फॉरेस्ट, ग्रेहाम व वेस्ट यांचे ग्रंथ, व सरकारी गॅझेटियर यांतल्या माहितीचा व जुन्या माहितगारांनी दिलेल्या माहितीचा उपयोग करून घेतला आहे. या पुस्तकांत डफ् साहेबांच्या इतिहासाचा जेथे जेथे उल्लेख केला आहे तेथे तेथे तो इतिहास म्हणजे सन १८७३ मध्ये ‘ टाइम्स ऑफ इंडिया ' छापखान्यांत छापलेला ग्रंथ होय असे समजावें. मिरज, ता० १९ मे स० १९१३. वासुदेव वामन खरे. इचलकरंजी संस्थानाचा इतिहास. प्रकरण पहिलें. कापशीकर घोरपडे यांची थोडी हकीकत. ≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈ इचलकरंजी संस्थानाचा मूळ उगम कापशी संस्थानापासून असल्यामुळें कापशीकरांची थोडी हकीकत प्रस्ताविक रीतीनें आरंभी देणें इष्ट वाटतें. उत्तरहिंदुस्थानांत यवनांचें प्राबल्य झाल्यामुळें राजपुताना, माळवा, बुंदेलखंड या प्रांतांतील हजारों रजपूत घराणीं दक्षिण देशीं रहावयास आली व या महाराष्ट्रांत गांवोगांव पाटिलक्या वगैरे वतनें संपादन करून राहिली. या लोकांस 'मराठे' असे नांव असून त्यांची शाण्णव कुळे आहेत अशी प्रसिद्धि आहे. त्या सर्वांत अत्यंत श्रेष्ठतेस पोंचलेले घराणे भोसल्यांचें आहे व त्याचा विस्तार सर्व महाराष्ट्रदेशभर पसरला आहे.भोसल्यांचें मूळ पुरुष उदेपुरच्या राजकुलापैकीं होते असें म्हणतात. शककर्ते शिवाजीमहाराज यांचा जन्म याच कुळांत झाला. भोंसल्यांच्या कुळाच्या एका शाखेस ‘घोरपडे' असें आडनांव आहे. असें आडनांव पडण्याचें कारण असे सांगतात कीं, बहामनी बादशहांच्या कारकीर्दीत घोरपडयांच्या कोणा पूर्वजानें घोरपड म्हणून एक जनावर असतें त्याच्या साधनानें एका किल्ल्याचा तट चढून तो किल्ला घेतला व त्या दिवसापासून त्यास व त्याच्या वंशजांस घोरपडे असें आडनांव पडलें, घोरपडयांची घराणी महाराष्ट्रांत असंख्य आहेत परंतु त्यांत कापशीकर व मुधोळकर घोरपडयांचींच काय तीं फार प्रसिद्ध अशीं आहेत. त्यांस अनुक्रमें नवकस व सातकस अशीं नांवें आहेत. या नांवांच्या अर्थाबद्दल कित्येकांनीं नाना प्रकारचे तर्क केले आहेत. परंतु सार्वत्रिक समजूत अशीं आहे कीं, बादशाही कारकीर्दीत कोणा एका काळीं कापशीकरांच्या घराण्यांतले नऊ पुरुष सरदारीचा अधिकार चालवीत होते व त्याच वेळीं मुधोळकरांच्या घरांतले सात पुरुष तेंच काम करीत होते. एकेका कुळांतले इतके पुरुष एकाच वेळीं राजकीय उलाढालींत प्रमुख असल्याचें पाहून लोकांस कौतुक वाटे; शिवाय या उभय कुलांमध्यें भाऊबंदकीची स्पर्धा असल्यामुळें एकमेकांवर पराक्रमाची चढाओढ चालू होती, या मुळें कापशीकर 'नवकस' व मुधोळकर 'सातकस' अशा नांवांनीं लोकांत प्रसिद्धि पावले. ही सार्वत्रिक समजूत आम्हांस बरोबर वाटते. कारण ‘असामी' या अर्थीं ‘कस' शब्दाचा प्रयोग जुन्या कागदपत्रांत केलेला आमच्या पाहण्यांत आहे. कापशीकर व मुधोळकर ही दोन्हीं घराणीं विजापूरच्या बादशाहींत लष्करी कामांत उत्कर्ष पावलीं होतीं व दोघांसही या बादशहांकडून सरंजाम व मानमरातब चालत होते. विजापूरच्या बादशहाकडून कापशीचें ठाणें व त्याभोंवतालचा कांहीं तालुका कापशीकरांकडे सरंजाम म्हणून चालत होता. त्यांस ‘हिंदुराव' हा किताब बहामनी बादशहांच्या वेळेस मिळालेला असावा. 'अमीर-उल्-उमराव' हा किताब मात्र त्यांस विजापूरच्या बादशहांकडून मिळालेला आहे. कोल्हापूर प्रांताची देशमुखी व सरदेशमुखी कापशीकरांकडे कधी आली हें समजत नाहीं. तथापि ती विजापूरकरांच्या अमदानींत त्यांजकडे चालत असवी असा तर्क करण्यास जागा आहे. कारण कीं, विजापूरच्या बादशाहींत कापशीकरांच्या जोडीचे दुसरे मराठे सरदर फलटणचे निंबाळकर, मलवडीकर घाडगे, म्हसवडकर माने, जतकर डफळे व वाडीकर सावंत हे सर्व देशमुखच होते व शेजारच्या निजामशाहींतले सरदार जाधव व शिवछत्रपति ज्या कुळांत जन्मास आले ते भोंसले हेही देशमुखच होते. मुधोळकर घोरपडे शिवाजीमहाराजांचा अभ्युदय होत होता त्या वेळी त्यांशीं वैरभाव धरून विजापूरच्या बादशाहीस चिकटून राहिले, परंतु कापशीकरांची गोष्ट तशी नाही. यांच्या घराण्यांत त्या वेळी म्हाळोजी घोरपडे मुख्य होते. त्यांनीं बादशहाची चाकरी सोडून शिवाजीमहाराजांचा पक्ष धरिला होता. त्यांचें पांचशें स्वारांचें पथक होतें. या पथकानिशीं स्वारींत हजर राहून ते शिवाजीमहाराजांची एकनिष्ठेनें चाकरी करीत असत. त्यांस संताजी, बहिरजी व मालोजी असे तीन पुत्र झाले. ते तिघेही पराक्रमी निघाले. तेव्हां शिवाजीमहाराजांनीं त्या तिघांस तीन स्वतंत्र पथकांची सरदारी सांगून त्यांची चाकरी हंबीरराव सेनापतीच्या निसबतीस लावून दिली. त्या तिघां भावांत शूरत्वाविषयीं संताजीरावांचा नांवलौकिक विशेष झाला होता. सन १६७७|७८ सालीं शिवाजीमहाराजांची कर्नाटकांत चंदीचंदावराकडे मोहीम झाली तींत हंबीरराव सेनापति होते. तिकडून ते सेनापति परत स्वदेशीं येत असतां त्यांनीं तुंगभद्रच्या तीरावरचा मुलूख व त्यांतले कोपळ, बहादुरबिंडा, गजेंद्रगड वगैरे प्रसिद्ध किले घेतले. तो मुलूख विजापूरच्या बादशहांचा असल्यामुळें त्यांनीं सेनापतीच्या पारिपत्याकरितां एकामागून एक दोन फौजा पाठविल्या. परंतु सेनापतींनी त्या दोन्ही फौजांचा पराजय करून त्यांतलें मुख्य सरदार धरून कैद केले. त्या दोन युद्धांत संताजी व बहिरजी घोरपडे यांनीं फार पराक्रम केला. त्यावरून शिवाजीमहाराजांनीं प्रसन्न होऊन त्या दोघां बंधूस तों नवीन जिंकलेला मुलूख जहागीर दिला. ही गोष्ट घोरपड्यांच्या इतिहासांत एक प्रकारें महत्वाची आहे. कारण कीं, त्या दिवसा पासून त्या टापूंत गजेंद्रगड येथें घोरपडयांचें ठाणें बसलें व त्यांपैकीं एका शाखेस 'गजेंद्रगडकर' हें नांव पडलें. मुधोळकर घोरपड्यांस पूर्वी इदिलशाहींत कर्नाटकप्रांतीं जहागीर होती, परंतु ती त्यांच्या हातून गेल्यावर त्यांचा तिकडचा संबंध तुटला. त्यांनीं इनामें, वतनें, सरंजाम वगैरे काय मिळविलें तें महाराष्ट्रांतच मिळविलें. त्यामुळें त्यांची करामत महाराष्ट्रदेशांतल्या उलाढालींत मात्र दिसून आली. कृष्णातीरचे चव्हाण, थोरात वगैरे दुसरे सरदार होते त्यांचा कर्नाटकांत कधीं शिरकाव न झाल्यामुळें तेही दक्षिण महाराष्ट्रांतच सरंजाम वगैरे मिळवून राहिले. हे सारे 'महाराष्ट्रांतले सरदार' म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु कापशीकर व त्यांचे अनुयायी इचलकरंजीकर यांची प्रसिद्ध ते 'कर्नाटकांतले सरदार' म्हणून आहे. कापशीकर घोरपड्यांची पाटिलकीची वतने सातारा जिल्ह्यांत आहेत, पण त्यांनीं कृष्णेच्या उत्तरेस कधीं जहागीर मिळविण्याच यत्न केला नाही. प्रथमपासून त्यांचें वळण कर्नाटकाकडे पडत गेल्यामुळें तोच मुलूख त्यांच्या व त्यांचें अनुयायी इचलकरंजीकर यांच्या कर्तृत्वाचें क्षेत्र होऊन बसला. सन १६८९ त औरंगजेबानें संभाजीमहाराजांस धरून कैद केलें त्या वेळीं लढाई झाली तींत म्हाळोजी घोरपडे ठार झाले. बादशहाच्या फौजेचा छापा येण्यापूर्वीच संभाजीमहाराजांस सुरक्षित स्थळीं पोचवावें म्हणून बहिरजी घोरपड्यांनीं यत्न केला, परंतु संभाजीमहाराजांच्या दुराग्रहापुढें त्यांचें कांही चाललें नाही, व ते महाराज वर सांगितल्याप्रमाणें धरले जाऊन त्यांस औरंगजेबानें ठार मारविलें. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधु राजाराममहाराज गादीवर बसले. त्यांनीं सन १७९१ सालीं संताजी घोरपडे यांस सेनापतीचें पद दिलें. येथपर्यंत कापशीकर घोरपडयांची हकीगत निरनिराळ्या बखरी व टिपणें यांतील तात्पर्यायी एकवाक्यता करून लिहिली आहे. हिचा उपयोग पुढील कथेचें अनुसंधान समजण्याकरितां होण्याजोगा आहे. यापुढची या घराण्यची हकीकत इचलकरंजीकरांच्या वृत्तांतांत जेथें जेथें संबंध येईल तेथे तेथे सांगण्यांत येईल. प्रकरण दुसरें. नारो महादेव. ≈≈≈≈≈≈≈≈ इचलकरंजीकर घोरपडयांचें उपनाम जोशी. कोंकणस्थ ब्राह्मणांत ज्यांचें जोशी आडनांव आहे त्यांचीं वरवडेंकर व संगमेश्वरकर अशी दोन खुंटें फार प्रसिद्ध आहेत. त्यांतले त्यांत वरवडेंकरांचा विस्तार फारच

Page 1 of 1

Public Domain (Wikisource; Wikidata creator death + pub-year check)

Public-domain text, read inside the house. Position stays on this device.

loyalties.space is the house for book authors: letters, the retail desk, and the launch. President Izno writes Netherfiend. Reviews are never bought. Lists are never rented. The house keeps the letters, the library, and the launch desk.

Amber Kumar, Defence Road, Tilpata Karanwas, Greater Noida, Uttar Pradesh 201306, India · hello@loyalties.space

Nothing playing. Choose a book to read or listen.