समाजशास्त्रावरील व्याख्याने - विकिस्रोत Jump to content Main menu Main menu move to sidebar hide सुचालन मुखपृष्ठ समाज मुखपृष्ठ सद्य घटना अलीकडील बदल अविशिष्ट लेख साहाय्य चावडी शोधा शोधा Appearance दान नवीन खाते तयार करा प्रवेश करा(लॉग इन करा) वैयक्तिक साधने दान नवीन खाते तयार करा प्रवेश करा(लॉग इन करा) समाजशास्त्रावरील व्याख्याने Add languages दुवे जोडा लेख स्त्रोत चर्चा मराठी वाचा संपादन इतिहास पहा साधने Tools move to sidebar hide Actions वाचा संपादन इतिहास पहा General येथे काय जोडले आहे या पृष्ठासंबंधीचे बदल संचिका चढवा शाश्वत दुवा पानाची माहिती हे पान उधृत करा Get shortened URL छापा PDF छापा छापण्यायोग्य आवृत्ती इतर प्रकल्पात विकिडाटा कलम Appearance move to sidebar hide Download विकिस्रोत कडून समाजशास्त्रावरील व्याख्याने (1914) साहित्यिक गोविंद चिमणाजी भाटे sister projects: Wikidata item. 111258समाजशास्त्रावरील व्याख्याने1914 समाजशास्त्रावरील व्याख्यानें अथवा हिंदुसमाजांतील कांहीं चालीरीतींचें समाजशास्त्रदृष्ट्या विवेचन व्याख्यानकार गोविंद चिमणाजी भाटे, एम्. ए., लाईफमेंबर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे. हे पुस्तक पुणे येथे आर्यभूषण छापखान्यांत नटेश अप्पाजी द्रविड यांनी छापून प्रसिद्ध केलें. सन १९१४. किंमत आठ आणे. आपल्या प्रतिभासंपन्न लेखांनीं व अद्वितीय अध्यापन कौशल्यानें सुधारणेचीं तत्त्वे मनांत बिंबविणारे माझे परमपूज्य गुरुवर्य कै. प्रि. गो. ग. आगरकर यांचे चरणीं ही अल्पशी व्याख्यानमाला अपर्ण केली आहे. व्याख्यानकार. प्रस्तावना. या व्याख्यानमालेवें प्रसिद्धीकरण म्हणजे एक त्रिवेणी संगमच आहे. ही व्याख्यानमाला प्रथमतः मुंबईच्या सोशल सर्व्हिस लीगच्या विद्यमानें मीं इंग्रजीत गुंफिली. तेव्हां त्या व्याख्यानांचा शब्दशः रिपोर्ट माझ्या मुंबईच्या दोघां लघुलेखक मित्रांनी देण्याचें कबूल केलें व त्या इंग्रजी रिपोर्टावरून त्याचें मराठीत भाषांतर करण्याचे काम माझे जुने मित्र रा. गोविंद्राव टिपणीस यांनी अंगावर घेतलें पण 'सर्वारंभास्तण्डुलाः प्रस्थमूलाः' या न्यायानें पुस्तकप्रकाशनास लागणारी द्रव्याची मदत कोठून व्हावी, हा प्रश्न होता, पण ही मदत माझे नवे मित्र रा. राघवेंद्रराव, हायकोर्ट वकील, गुलबर्गा, यांनी केली व यामुळेच या पुस्तकाच्या प्रकाशनाचा इतक्या लवकर सुयोग आला. या व्याख्यानमालेतील तीन व्याख्यानें हिंदुसमाजतील सामाजिक सुधारणेबद्दलच असल्यामुळे माझ्या वकील मित्रांनी 'हें पुस्तक सामाजिक परिषदेच्या सुमारास प्रसिद्ध होईल तर बरें' असे सुचविलें आणि म्हणूनच त्यांच्या इच्छेप्रमाणे मी पुस्तक प्रकाशित करविण्याचे कबूल करून तें छापण्यास प्रारंभही केला. माझे मित्र रा. गोविंदरावजी टिपणीस यांनी सहा व्याख्यानांपैकीं लघुलेखकांकडून मिळालेल्या तीन व्याख्यानांचें भाषांतर करून पाठविलें. इतक्यांत त्रिवेणीगंगेपैकी लघुलेखनरूपी गंगा गुप्त झाली किंवा कोरडी पडली. पुस्तक छापण्यास सुरुवात केली; त्याबद्दल जाहिरातही दिली. पण लघुलेखकांडून राहिलेल्या तीन व्याख्यानांचा रिपोर्ट येईना व पुढे तर तो रिपोर्ट मिळणें शक्य नाहीं असें झालें. याप्रमाणें या पुस्तकाच्या प्रकाशनांतली एक गंगा आटली व पुस्तक प्रकाशन दिरंगाईवर पडण्याची वेळ आली. तेव्हां माझ्या वकील मित्राचा हिरमोड न व्हावा म्हणून मीं ज्या सरस्वतीच्या कृपाप्रसादामुळे मला मूळ ही व्याख्यानमाला गुंफितां आली तिची आराधना करून दिलेल्या व्याख्यानांचे होईल तितकें स्मरण मी केलें आणि राहिलेलीं तीन व्याख्याने एकदमच मराठीत लिहून काढली. याप्रमाणें या व्याख्यानमालेच्या प्रकाशनाचा इतिहास आहे. यावरून हे पुस्तक किती घाईने व किती अडचणीनें प्रसिद्ध झालें आहे, हे वाचकांस समजून येईल. या पुस्तकाच्या प्रसिद्धीकरणाचें सर्व श्रेय माझ्या मित्रत्रयास आहे. माझ्या लघुलेखक मित्रांनी जर मला रिपोर्ट देण्याचें कबूल केलें नसतें तर ही व्याख्यानमाला प्रसिद्ध करण्याचे माझ्या मनांत आलेच नसतें. पण या मनोरथाला मूर्त स्वरूप देण्याचे काम माझ्या वकील मित्राची मला झालेली मदत अमर्याद आहे. कारण द्रव्याच्या अभावी माझा हा मनोरथ जागच्याजागींच थबकून राहिला असता. माझे बालमित्र रा. गोविंदरावजी टिपणीस यांच्या भाषांतर करण्याच्या तत्परतेमुळे पुस्तक प्रकाशन शक्य झालें. म्हणून मी या तिघांही मित्रांचा फार आभारी आहे. इतकी पुस्तकप्रकाशनाबद्दल आवश्यक माहिती सांगून मी या व्याख्यानांच्या विषयाकडे वळतो. हल्ली पाश्चिमात्य देशांत समाजशास्त्राच्या अध्ययनाला फार महत्व देतात. ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला अर्थशास्त्राच्या मूलतत्त्वांची माहिती असणे आवश्यक आहे असें तिकडे समजतात, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाला समाजशास्त्राच्या मूलतत्त्वांचीही माहिती असणे जरूर आहे, असें तिकडे लोकमत होऊं लागलें आहे. हें शास्त्र जितकें मनोरंजक आहे, तितकेच ते अर्वाचीन काळी आवश्यक आहे. समाजांतील चालीरीती, त्यांची उत्पत्ति, वाढ, त्यांत होणारे फरक, यांची माहिती प्रत्येक समाजघटकास असणे श्रेयस्कर आहे. आपला हिंदुसमाज आज हजारों वर्षांचा जुना आहे, त्याचा सामाजिक इतिहास फारच मनोरंजक आहे व त्यासंबंधी आपल्याइकडे वाङ्मयही फार आहे. आमची श्रुति, स्मृति व पुराणें ही सामाजिक चालीरीतीच्या रत्नांचीं भांडारेंच आहेत. आमचे स्मृतिकार सर्वसंग्रही होते. त्यांनी आपल्या ग्रंथांत चमत्कारिक चालीरीतींची जणूं कांहीं जंत्रीच करून ठेविलेली आहे. पण आमच्या स्मृतिकारांना ऐतिहासिक दृष्टि नव्हती; त्यांची दृष्टि निवळ सर्वसंग्रही होती. यामुळेच आमच्या इकडे समाजशास्त्र बनूं शकलें नाहीं. परंतु पाश्चिमात्य लोकांच्या ऐतिहासिक दृष्टीमुळे त्यांनी निरानिराळ्या चालीरीतींचा संगतवार इतिहास तयार करून त्यापासून शास्त्रीय नियम शोधून काढिले. आमच्या स्मृतिकारांना ही ऐतिहासिक दृष्टि नसल्यामुळे त्यांच्या ग्रंथांतील ज्ञानरत्नें विस्खलित व कशीबशी कोंबून भरल्याप्रमाणे दिसतात. पण कोणी ऐतिहासिक दृष्टिरूपी धाग्याचा पुरवठा करून जर त्या रत्नांचा हार बनविला तर तो सर्व जगास दिपवून टाकणारा होईल. पण हे काम अर्वाचीन पद्धतीनें शिकलेले लोकच करूं शकतील. अशा दृष्टीनें आपल्या चालींकडे पाहण्याची बुद्धि आमच्या तरुण पिढीत उत्पन्न व्हावी, या बुद्धीनें मीं ही व्याख्यानमाला गुंफिली. पहिल्या तीन व्याख्यानांत मीं युरोपामध्यें या शास्त्राच्या झालेल्या वाढीचा आणि त्यांतील प्रमुख प्रमेयांचा वृत्तांत दिला आहे. तो अर्थातच फार त्रोटक आहे. पण तो वाचून या विषयाची जर कोणास गोडी लागेल व जर कोणाला या विषयावरील प्रचंड वाङ्मय वाचण्याची बुद्धि होईल तर माझ्या श्रमाचें सार्थक झालें असें मी समजेन. पुढल्या तीन व्याख्यानांत मी समाजशास्त्रदृष्टया आपल्या कांहीं चालीरीतींचा थोडक्यांत विचार केला आहे. या ऊहापोहामध्ये आपल्या चालीरीतींकडे खऱ्या शास्त्रीय दृष्टीने कसें पाहावयाचें हें मी दाखविण्याचा प्रयत्न केला असून हिंदुसमाजशास्त्राला आपल्या वाङ्मयांत कसा पुष्कळ अवसर आहे, हें दाखविलें आहे. तसेंच आमच्यांतील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचें समर्थन समाजशास्त्राने कसें करतां येतें, याचेंही दिग्दर्शन मी केलें आहे. या व्याख्यानापासून वाचकांच्या मनांत आमच्यांतील सामाजिक चळवळीबद्दल सहानुभूति उत्पन्न झाली तर या व्याख्यानत्रयीचे कार्य झालें असें मला वाटेल. वाचकांच्या सोईकरितां या व्याख्यानांत आलेल्या नव्या मराठी शब्दांची व ते शब्द मी ज्या मूळ इंग्रजी शब्दांकरितां योजिले आहेत त्यांची एक यादी या पुस्तकांत शेवटीं जोडिली आहे. त्यायोगें व्याख्यानें समजण्यास सुलभ जाईल, अशी मला आशा आहे. पुणे, नारायण पेठ घ. नं. २७७. व्याख्यानकर्ता ता. १५ मे १९१४. प्रो. भाटे यांची समाजशास्त्रावरील व्याख्यानें. व्याख्यान १ ले. ( ता. ८ सप्टेंबर सन १९१३.) समाजशास्त्राचा अभ्यास आणि त्याचं महत्व. सद्गृहिणी आणि सद्गृहस्थ हो, आपणाला एकाद्या प्रांताच्या अगर देशाच्या राजकीय आणि सृष्टिविषयक भूगोलविद्यचें ज्ञान करून घ्यावयाचे असल्यास आपण तो देश समक्षच पाहिला पाहिजे. अशा प्रत्यक्ष दर्शनानें आपणांस तेथील पर्वतांच्या रांगा, नद्यांचे प्रवाह, सुपीक प्रदेश, ओसाड मैदानें, आणि उंचसखल भाग, ह्यांचें ज्ञान होऊन त्या देशाचें सामान्य स्वरूप आपणांत जसें कळून येईल तसें तें तो देश न पाहतां कळून येणार नाहीं. तेव्हां कोणत्याही देशाची अशी माहिती मिळवावयाची असेल तर त्या देशाचा प्रवास अवश्य केला पाहिजे. पण असा प्रवास करण्यापूर्वी देशाचे राजकीय विभाग दाखविणारा साधा नकाशा व त्या देशाचा निम्नोन्नतिदर्शक नकाशा (Relief map) यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणे जरूर आहे. पहिल्या नकाशाकडे पहाताच आपणांस देशाच्या मर्यादा, चतुःसीमा, आणि त्याचे मुख्य विभाग कळून येतील. दुसऱ्या नकाशाकडे पाहतांच आपणांस त्या देशांच सामान्य स्वरूप त्यांतील पर्वताची आणि दऱ्याखोऱ्याची व नद्यानाल्यांची व उंचसखल भागांची तेव्हांच कल्पना येईल. या दोन नकाशांचा आपणाला आपल्या प्रवासाच्या व त्या देशाविषयी माहिती मिळविण्याच्या कामी चांगलाच उपयोग होईल, हे नव्यानें सांगण्याची जरूरी नाहीं. देशाचे ज्ञान मिळविण्याला जी गोष्ट लागू आहे तीच शास्त्राच्या ज्ञानाला लागू आहे. एखाद्या विषयाचे पूर्ण ज्ञान करून घ्यावयाचे असल्यास त्या विषयांत प्रावीण्य संपादिलेल्या सुप्रसिद्ध लेखकांचीं पुस्तकें आपण स्वतः वाचून तीं नीट समजून घेतली पाहिजेत. असे केल्यावांचून आपणास त्या विषयांत प्रावीण्य संपादन करतां येणार नाहीं. परंतु प्रवासाच्या कामी आतांच सांगितलेले दोन प्रकारचे नकाशे ज्याप्रमाणे मार्गदर्शक होतात त्याप्रमाणेंच ज्या विषयाचा आपणांस अभ्यास करावयाचा असेल त्या विषयाचा परिचय करून देणारे उपोद्घातात्मक व प्रस्तावनात्मक लेख आपणांस आपल्या अभ्यासाच्या कामी मार्गदर्शक होतात. मी येथें जीं व्याख्यानें देणार आहें तीं समाजशास्त्रासारख्या गहन आणि व्यापक विषयाच्या अभ्यासाला केवळ उपोद्धाताप्रमाणे मार्गदर्शक व्हावींत अशीच माझी इच्छा आहे. मी एकंदर सहा व्याख्यानें देणार आहे. त्यांपकी पहिल्या तीन व्याख्यानांत मी समाजशास्त्राची उत्पत्ति व वाढ आणि त्या शास्त्रांतील प्रमेये यांची माहिती सांगून पुढील तीन व्याख्यानांत ह्या शास्त्रांचीं तत्त्वें आमच्या चालीरीतीस कशी लागू पडतात, हें सांगणार आहे. आतां प्रत्येक व्याख्यान फार झालें तर तास सवा तास होईल. तेव्हां इतक्या थोड्या अवकाशांत मला आपणांस ह्या शास्त्राची पूर्ण माहिती व ज्ञान करून देतां येणार नाहीं. तसे होण्यास शास्त्रीय वाङ्मय स्वतः वाचलें पाहिजे. हीं व्याख्यानें ज्यांना ह्या शास्त्राचा अभ्यास करावयाचा असेल त्यांना केवळ मार्गदर्शकाप्रमाणें उपयोगीं पडलीं म्हणजे बस्स आहे. भूगोलज्ञानाला जसा साधा नकाशा तसें माझे पहिले व्याख्यान समाजशास्त्रज्ञानाला होय. यांत मी फक्त या शास्त्राची व्याख्या देऊन याला शास्त्रीय स्वरूप केव्हां व कसे प्राप्त झाले आणि ह्या शास्त्रांतील तत्त्वांचा शोध कसकसा लागला हे दाखवून ह्या समाजशास्त्राचे महत्व काय आहे ते सांगणार आहे; आणि यापुढील दोन व्याख्यानांत ह्या शास्त्रांतील महत्वाचीं प्रमेये सांगावी असा माझा विचार आहे. म्हणून माझें दुसरें व तिसरे व्याख्यान हीं निम्नोन्नतिदर्शक नकाशाप्रमाणे आहेत असें म्हटले तरी चालेल, ह्यापेक्षां जास्त माहिती ह्या शास्त्राचा अभ्यास करूं इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतः मिळवून तिचें मनन केलें पाहिजे. या व्याख्यानमालेपासून समग्र शास्त्राचें पूर्ण ज्ञान आपल्यास होणें दुरापास्त आहे. ही व्याख्यानमाला समाजशास्त्राला प्रस्तावनेदाखल झाली म्हणजे पुरे आहे. आतां प्रथम आपण या शास्त्राच्या नांवाचा विचार करूं, शब्दापुरतें पाहूं गेलें तर ह्या शब्दाची उत्पत्ति अगदी अलीकडची आहे. विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ कॉम्ट यानें स. १८३९ च्या सुमारास ह्या विषयावर जी व्याख्याने दिली त्याने ह्या शब्दाची प्रथम योजना केली. इंग्रजीमध्ये ह्या शास्त्राला Sociology (सोशिऑलजी) अशी संज्ञा आहे. सोशिऑलजी हा शब्द, एक लॅटिन आणि एक ग्रीक अशा दोन भाषांतील दोन शब्दांच्या योगानें झालेला एक धेडगुजरी सामासिक शब्द असल्यामुळे आरंभी ह्या शब्दावर बरीच टीका झाली. लॅटिन शब्द 'सोसिअस' असा असून त्याचा अर्थ मित्र किंवा सोबती असा आहे आणि ग्रीक शब्द 'लोगस' असा असून त्याचा अर्थ ज्ञान किंवा शास्त्र असा आहे. एकंदरींत ह्या व्युत्पत्तीवरून पाहिलें तर 'सोशिऑलजी' म्हणजे, मैत्रीचें, संगतीचें अथवा समाजाचें शास्त्र, किंवा पद्धतशीर ज्ञान असा अर्थ होतो. धेडगुजरी म्हणून भाषाशास्त्राच्या दृष्टीने जरी हा शब्द कांहीं विद्वानांस टाकाऊ वाटला, तरी ज्या शास्त्रामध्यें युरोपांतील देशांच्या सामाजिक सुधारणेच्या उत्पत्तीचा आणि वाढीचा इतिहास सांगण्यांत आला आहे त्या शास्त्रास, ही पाश्चात्य सुधारणा प्रामुख्येंकरून ग्रीक आणि रोमन राष्ट्रांच्या सुधारणेपासूनच वाढीस लागली असल्यामुळे, ह्या दोन राष्ट्रांच्या भाषांतील दोन शब्दांच्या समासाने झालेले नावच असणे योग्य आहे असें पुष्कळ विद्वानांस वाटत आहे. 'सोशिऑलजी' शब्दाच्या उपपत्तीसंबंधानें केलें इतकें विवेचन पुरें आहे. आतां आपण ह्या शास्त्राच्या प्रतिपाद्य विषयाचा विचार करू. ह्या दृष्टीने पाहिलें असतां हे शास्त्र नवीन आहे, असें म्हणतां येणार नाहीं. याचें हें नांव जरी आतांच सांगितल्याप्रमाणे नवें आहे. तरी याचा विषय नवा नाहीं. तो फार जुनाच आहे. प्लेटो आणि ॲरिस्टॉट्ल यांना 'सोसिऑलजी' हा शब्द जरी माहिती नसला तरी त्यांनी ह्या शास्त्रांतील अनेक तत्वांचा ऊहापोह आपल्या ग्रंथांतून ठिकठिकाणी केला आहे. समाजशास्त्र स्वतंत्र समजून त्यांनी ह्या शास्त्राची निराळी चर्चा केलेली नाहीं इतकेंच! 'रेपब्लिक,' अथवा 'लोकसत्तात्मक राष्ट्र' नावाच्या आपल्या सर्वोत्कृष्ट ग्रंथांत, प्लेटोने समाजशास्त्र, राजनीतिशास्त्र आणि नीतिशास्त्र ह्या तीनही शास्त्रांवरील आपले